(मुंबई)
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे एफआयआरमध्ये ठाकरे आणि वरुण अशा नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्ष ज्यांनी हल्ला केला त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची ८ पथकं तयार करण्यात आली आहे. ज्यांच्यावर हल्ला झाला त्या संदीप देशपांडे यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली आहे.
मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे यांना कोणतंही संरक्षण नव्हतं. यापूर्वी त्यांना पोलीस संरक्षण देऊ केलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं होतं. संरक्षणाशिवायच ते लोकांमध्ये मिसळायचे. त्याचाच फायदा घेऊन हा हल्ला करण्यात आला असावा असं सांगितलं जात आहे. तसेच हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा एक भाग असावा अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
आपल्या जबाबात त्यांनी हल्ल्याचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. तसेच हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण अशी दोन नावं घेतल्याचंही देशपांडे यांनी जबाबात सांगितलं. पण हे ठाकरे आणि वरुण नेमके कोण हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, देशपांडेंवरील हल्ल्यानंतर विविध राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचा उल्लेख केला होता.
असा दिला देशपांडे यांनी जबाब
“मी ‘महाराष्ट नवनिर्माण सेना’ या पक्षाचा सरचिटणीस व प्रवक्ता आहे. मी दररोज सकाळी शिवाजीपार्क मैदानात मॉर्निंग वॉक करतो. सकाळी ६.४५ वा. च्या सुमारास घरातून निघतो. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे दररोज माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला असतात. आज सकाळी ६.५० वा. च्या दरम्यान घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजीपार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट नं. ५ वर पोहोचल्यावर मी घड्याळ पाहिले तेव्हा ७.०० वाजले होते. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे तोपर्यंत आले नव्हते. म्हणून मी एकट्यानेच वॉक सुरू केला. गेट नं. ५ समोर जॉगिंग ट्रॅकवर डावीकडे बळुन मी मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या दिशेने चालत गेलो. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाचे गेट नं. ५ कडे आलो. त्यावेळी अंदाजे ७.१५ वाजले असतील, गेट नं. ५ पास करून थोडा पुढे गेलो असताना कुणीतरी मागून माझ्या उजव्या पायाचे मांडीवर कोणत्यातरी टणक वस्तूने जोरात फटका मारला म्हणून मी लगेच मागे वळून पाहिले असता तीन/चार तरूण होते. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बँट होते. त्यांनी मला हातातील स्टंप व बँटने मारहाण केली. त्यांचपैकी एकजण माझे डोक्यावर बँट मारत असताना मी हात मध्ये धरला त्यामुळं मी वाचलो परंतू हातावर जोरात प्रहार झाला व मी खाली पडलो. मी पडल्यावरही त्यांनी मला स्टप व बँटने मारहाण केली. मारहाण करताना ते मला शिवीगाळ करत “तुझं खूप झालं, पत्र लिहीतोस का भडव्या ? ठाकरेंना नडतोस का ? वरूणला नडतोस का ?” असे बोलले. ते मला मारहाण करीत असताना मॉर्निंग वॉक करणारे लोक मला सोडविण्यासाठी जवळ येत असताना त्यांनी लोकांना मोठमोठ्याने “साले कोणी मध्ये याल तर, तुम्हालाही मारून टाकु”, असे बोलून आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे घाबरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची पळापळ झाली. भीतीने कोणी माझ्या मदतीला आले नाही. ते लोक मारहाण करून राजा बड़े चौकाच्या दिशेने पळत गेले. ते लोक गेल्यानंतर माझे मित्र ललित महाडिक व इतर लोक माझ्याजवळ आले. ललित महाडिक यांनी मला उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मला तपासुन उपचार केले. मारहाणीमध्ये माझा उजवा हात फ्रेंक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले, माझे डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली दुखापत झाली असुन, उजव्या पायावर व इतरत्र मुक्का मार लागला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांचं वर्णनही संदीप देशपांडे यांनी आपल्या जबाबाबात दिलं असून ते पुन्हा समोर आले तर त्यांना ओळखू असंही म्हटलं आहे.
पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तपास पथकं तयार केली आहेत. शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही सध्या तपासले जात आहेत. आरोपींच्या शोधासाठी ८ पथकांच्या माध्यमातून कसून तपास सुरू असल्याची माहिती, पोलिसांकडून दिली आहे.