(मुंबई)
महाराष्ट्र सामाईक परीक्षा विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी चार अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यंत्रणासुद्धा अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. सीईटी परीक्षेसंबंधी माहिती अलर्ट मिळवण्यासाठी सीईटी सेलकडून अॅप्लीकेशन सुरू केले जाणार आहे.
शिवाय विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्हॉट्सअप मेसेजसुद्धा सीईटी सेलकडून या परीक्षेसाठी सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा नोंदणीसोबतच कॅप राऊंड प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा त्रास वाचणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षास उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करणे, वेळोवेळी माहिती मिळविणे व इतर आवश्यक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती उमेदवारांना त्वरीत मिळणे या उद्देशाने अँड्रॉइड आणि आयओएस कार्यप्रणालीवर आधारीत मोबाईल प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येत आहे.