राज्यात सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. राज्यात कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा घेण्यासाठी सरकारकडून विशेष अभियान राबवले जात असताना बारावीचा पेपर फुटल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून ०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका फुटली होती. प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे वृत्त राज्यभर वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिले आहे.
गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींना सकाळी साडे दहा वाजता व दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर परीक्षा देणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही, असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान गट शिक्षणाधिकाऱ्याकडून सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.