(मुंबई)
होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी… संपला निवडणुकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा, रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले, गॅस दरवाढीचे विघ्न आणले… पुण्यात नाही चालले खोके, उदास झाले बोके… या सरकारचं करायचं काय, गरिबांच्या घरात जेवण नाय… शेतकऱ्यांची लाईट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला द्या लाईट, नाहीतर शेतकरी देईल फाईट… अशा विविध घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.