(नवी दिल्ली)
देशात महामार्गांवर धावणा-या वाहनांपैकी तब्बल 50 टक्के वाहने थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय धावत आहेत. आता केंद्र सरकार या विमा नसलेल्या वाहनांसाठी ऑन द स्पाॅट विमा काढण्याची तयारी करत आहे.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार, वाहतूक पोलीस विमा नसलेली वाहने जेव्हा पकडतील, तेव्हा त्यांच्या चालानसह वाहनांचा ऑन द स्पाॅट थर्ड पार्टी विमाही काढला जाईल. वाहन मालकाच्या फास्टॅग खात्यातून विमा प्रिमियमची रक्कम कापली जाईल. त्यामुळे बेजबाबदार वाहनधारकांना एकाच वेळी दोन दणके बसणार आहेत.
अॅपवरुन माहिती काढणार
- सरकार अशी एक प्रणाली बनवत आहे. ज्याअंतर्गत पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी महामार्ग मंत्रालयाच्या वाहन अॅपच्या मदतीने हातातील उपकरणातून वाहनांची संपूर्ण माहिती काढतील.
- जर वाहनाचा विमा उतरवला नसेल तर परिवहन विभागाच्या नेटवर्कशी जोडलेल्या सामान्य विमा कंपन्यांकडून लगेच पाॅलिसी खरेदी करण्याचा पर्याय असेल.
बॅंक- विमा कंपन्याही फास्टॅग प्लॅटफाॅर्मवर
- फास्टॅग शिल्लकमधून विमा प्रीमियम वजा करुन ऑन द स्पाॅट मोटार विमा पाॅलिसींसाठी त्वरित प्रीमियम भरण्यासाठी बॅंकांना तसेच विमा कंपन्यांना फास्टॅग प्लॅटफाॅर्मवर आणले जाऊ शकते.
- जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या एका अधिका-याने सांगितले की, कौन्सिलच्या बैठकीत स्पाॅट इन्शुरन्सवरही चर्चा झाली. आता त्याच्या अंमलबजावणीसाठी शिफारशी तयार केल्या जात आहेत. 17 मार्चच्या बैठकीत यावर अंतिम चर्चा होणार आहे.