(मुंबई)
शेजारी राहणाऱ्या कुटूंबीयांसोबत असलेल्या वादातून एका नराधमाने दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी रमेश दुबळा (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी रमेश दुबळा याचे मुलीच्या घरच्यांसोबत भांडण होते. या वादातूनच त्याने हे भयंकर कृत्य केले आहे. बुधवारी मृत मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला आपल्या गाडीवरून नेले. आरोपीने मुलीला घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केली. रात्री झाल्यानंतरही मुलगी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती मुलीला घेऊन जात असताना दिसून आली. चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती मुलीच्या घराशेजारीच राहणारी असल्याचे समोर आले, व ती व्यक्ती दुबळा असल्याचीही माहिती मिळाली. यामुळे दुबळा याचेकडे तपास वळविण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने रागातून हे कृत्य करून गळा दाबून तिची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.