(नवी दिल्ली)
ईशान्येकडील तीन राज्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आजचे निकाल हे देशाबरोबर जगभरातील लोकांसाठी संदेश आहे. भारतामध्ये आजही लोकशाहीवर किती विश्वास आहे आणि लोकशाही किती सक्षम आहे हे दर्शवणारे आजचे निकाल आहेत,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षावर सडकून टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले की, देशातील कोणत्याही निवडणुकीत सारखा भाजपाच विजय कसा काय होतो? मोदींनी आपल्या भाषणात या विजयाचे रहस्यही सांगितलं. त्यांनी सांगितले की, तीन गोष्टीत भाजपाच्या विजयाचं गुपित लपलं आहे. मात्र काहींना भाजपाच्या विजयाचं रहस्य काय आहे, याचा विचार करून पोटात दुखायला लागतं. मोदी म्हणाले की, भाजपाच्या विजयाचं रहस्य लपलं आहे त्रिशक्तीमध्ये. पहिली शक्ती आहे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये सरकारांनी केलेली विकास कामे, दुसरी शक्ती भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधील सरकारांची काम करण्याची पद्धत आणि तिसरी शक्ती भाजपा कार्यकर्त्यांची सेवाभावी वृत्ती.
आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसने छोट्या राज्यांविरोधात आपल्या मनातील द्वेष जाहीर केला आहे. त्यांच नेतृत्व म्हणतं की, ही तर छोटी राज्ये आहेत. त्यांना महत्त्व न देता काँग्रेस त्यांच्याकडे तिरस्काराने पाहते. याचा फटका त्यांना जास्त बसत आहे. त्यांच्या याच विचारामुळे छोट्या राज्यांना, गरीब आदिवासी लोकांना आतापर्यंत दूर्लक्षित करण्यात आलं. छोट्या राज्यांमधील लोकांबद्दल असलेला हा काँग्रेसचा द्वेषभाव येणाऱ्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभूत करेल, असा टोलाही मोदींनी लगावला.