(नवी दिल्ली)
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुरू असलेली आजची सुनावणी संपली. महाराष्ट्राच्या संबंधित खटल्यावर आज केवळ दोन तास सुनावणी झाली. आता यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होळीच्या सुट्टीनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी १४ मार्चनंतर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून कोर्टात हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला आहे.
उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर कदाचित त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, काहीही होऊ शकले असते? असा सवाल देखील आज उपस्थित केला. या युक्तीवादामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबली असून आता होळीनंतरही यावर शिंदे गटाकडून युक्तीवाद सुरू राहणार आहे.
सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी म्हणजेच २ मार्चला संपवा असं सरन्यायाधीशांनी मागील सुनावणीत निर्वाळा दिला होता. मात्र, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्या सरप्राईज एन्ट्रीमुळे सरन्यायाधीशांच्या निर्णयात मोठा बदल झाला आहे. आजची सुनावणी केवळ २ तासांतच उरकली.
हरीश साळवे यांचा युक्तिवाद आधीच्या वेळापत्रकात नव्हता. अचानक त्यांनी एन्ट्री केली. आज दोन तासातच कामकाज संपवले कारण आज दिवसभरामध्ये याबाबतची सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती. होळीच्या सुट्टीनंतर आता १६ मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे.