(मुंबई)
नवजात अर्भक म्हणजे मुदतपूर्ण आणि मुदतीपूर्वी अशा दोन्ही कालावधीत जन्माला आलेली बाळे असतात, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने एका विमा कंपनीला चांगलाच दणका दिला आहे. मुदतीपूर्वी (प्री-टर्म बेबी) जन्माला आलेल्या जुळ्या बाळांच्या उपचारांचा ११ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च आणि वर आणखी पाच लाख रूपये आईला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने विमा कंपनीला दिले.
विमा कंपनीने स्वत:च्या धोरणांविरोधात अकारण, अवाजवी आणि मूलभूत विश्वासाला छेद देणारी भूमिका घेऊ नये. त्यांचा अशा प्रकारचा दृष्टीकोनही ग्रा धरता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. नऊ महिन्यानंतर आणि त्यापूर्वी असा कोणताही भिन्न प्रकार विमा कंपनीने दर्शवलेला नाही. नवजात बाळ हे जन्माला आलेले नवजात अर्भकच असते आणि त्यासाठी लागणारा कालावधी हा गौण असतो, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. विमा कंपनीच्या मते पुरेशा निर्धारित कालावधीनंतर जन्माला येणारी बाळेच नवजात असतात, हा त्यांचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच वैद्यकीय उपचारांसाठी केलेल्या दाव्याचे ११ लाख रुपये यांसह अतिरिक्त ५ लाख रुपये चार आठवड्यांत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.