(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे येथे आई कालिका किडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित कबड्डी स्पर्धा 2023 (स्व.उत्पल उर्फ भाई पाटील स्मृती चषक) चा मानकरी इन्शुरकॉट स्पोर्ट पा.लि. मुंबई शहरची ‘युवा फलटण’ हा संघ ठरला. तर उपविजेता मुंबईतील मध्य रेल्वे हा संघ ठरला.
मिरजोळे येथे आई कालिका किडा मंडळाच्यावतीने ही राज्यस्तरीय व्यवसायिक निमंत्रित कबड्डी स्पर्धा 2023 नुकतीच पार पडली. अनेक राष्ट्रीयस्तरावर नावाजलेल्या कबड्डी खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले. राष्ट्रीय स्तरावर खेळवल्या जाणाऱ्या प्रो कबड्डी लिग या स्पर्धेत शुभम शिंदे, स्वप्नील शिंदे, अजिंक्य पवार, अस्लम इनामदार, मोहिते, लांडगे, साईराज पाटील, शुभम शेळके, यांसारख्या अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा सहभागी संघामध्ये होता. त्यामुळे या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी रत्नागिरीतील क्रीडा रसिकांना लाभली.
या स्पर्धेतील अंतिम सामना मुंबई शहरचा संघ युवा फलटण विरुध्द मध्य रेल्वे या संघांमध्ये झाला. अंत्यत चुरशीच्या रंगलेल्या या सामन्यात युवा फलटण या संघाने विजेता हा मान पटकावला. या विजेता व उपविजेता संघ तसेच खेळाडू व सहभागी संघांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिके देउन पार पडला. त्या कार्यकमाप्रसंगी माजी आमदार बाळ माने, माजी जि.प.सभापती महेश उर्प बाबू म्हाप, गजेंद्र पाथरे, सौ. माधवी माने, माजी पं.स.सदस्या सौ. स्नेहल पाटील, उत्तम पाटील, स्वामी बाळ सत्यधारी महाराज, माजी सरपंच संदीप उर्फ बावा नाचणकर, गावचे मानकरी शरद पाटील, किडा मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील, दत्तू कीर, संदेश वाडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी विजेता संघ बँक ऑफ बडोदा, मुंबई शहर हा ठरला. चतुर्थ कमांक विजेता संघ महिंद्रा अण्ड महिंद्रा, मुंबई शहर या संघाला आकर्षक चषक व रोख पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई युवा फलटण या संघाचा शुभम शेळके, उत्कृष्ट पकड युवा फलटणचा साईराज पाटील, सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मध्य रेल्वेचा अजिंक्य पवार, यांनी पटकावला.
स्पर्धेसाठी गजेंद्र पाथरे (समर्थ रोडलाईन्स), उत्तम पाटील, प्रविण पवार, महेश उर्प बाबू म्हाप, स्वामी बाळ सत्याधारी महाराज, वैभव शिवलरकर, पसाद शेट्ये, केदार कीर, समीर पाटील, रोहन मयेकर, संदेश कळंबटे, यांनी चषक व रोख पारितोषिक देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेचा उद्घाटन कार्यकम उद्योजक रविंद्र उर्प अण्णा सामंत, आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळ माने, स्वामी बाळ सत्याधारी महाराज, सरपंच गजानन गुरव, बावा नाचणकर, शिमगाप्रमुख शरद पाटील, प्रविण पवार आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.