(नवी दिल्ली)
संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाने कब्जा केला आहे. संसदेतील या शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो ऐवजी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत. याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो शिवसेना संसदीय कार्यालयात लागल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर दिल्लीपर्यंत फरक जाणवू लागला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला. त्यानंतर आता दररोज नवीन बदल दिसून येत आहेत. शिंदे गटाचे नेते अतिशय आक्रमकपणे आपले बस्तान मांडण्याच्या मार्गावर दिसत आहेत.