(मुंबई)
राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. मात्र आता या मागण्यांबद्दल राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. यासाठी त्यांनी अनेक वेळा शासन दरबारी प्रयत्न केले होते. या सेविकांच्या मागणीला आता यश आले आहे.
राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. तसंच त्यांना मोबाईल फोन्सही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने रविवारी घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून अंगणवाडी सेविकांचे मानधन 4,050 वरून 5,000 रुपये, मदतनिसांचे मानधन 2,000 वरून 2,500 रुपये होईल, तर मिनी अंगणवाडी सेविकेला 1,950 ऐवजी 2,400 रुपये मानधन मिळेल.
नव्या निर्णयानुसार, सेविकांच्या मानधनात 950 रुपये, मदतनिसांच्या मानधनात 500 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 450 रुपये वाढ होणार आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार 125 कर्मचार्यांना लाभ होईल. मात्र, तिजोरीवर दरमहा 14 कोटी 75 लाख रुपये व वार्षिक 177 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वाढले
‘मनरेगा’तील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. सध्या त्यांना 1000 दिवसांपर्यंत मजुरी खर्चाच्या 2.25 टक्के मानधन देण्यात येते, ते आता 6 टक्के करण्यात येईल. 2000 दिवसांपर्यंत हे मानधन 4 टक्के (सध्या 2.25 टक्के) देण्यात येईल.