रत्नागिरी : टाळेबंदीच्या काळातही जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढतो आहे. या संख्येत गल्लत केली जात आहे. रुग्ण सापडल्यानंतर ट्रॅकिंग करून त्या त्या व्यक्तीची तपासणी अनिवार्य आहे. किमान एक महिन्याचे उद्दिष्ट ठेवून रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे. आता यावर एकच प्रभावी उपाय म्हणजे दररोज किमान 20 हजार नागरिकांचे लष्करी पद्धतीने लसीकरण. त्याकरिता आवश्यक लसींचा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे ई- मेलद्वारे आज सायंकाळी पाठवले आहे.
अॅड. पटवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा गेले 2 महिने टाळेबंदीसदृश स्थितीत आहे. मात्र रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. तसेच मृतांची संख्याही रोज 20 च्या घरात आहे. यामुळे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांची आर्थिक स्थितीही ढासळली आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थ आणि अस्थिर मनःस्थिती आहे. टाळेबंदीची अंमलबजावणी नियंत्रण करणेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र टाळेबंदीची शिस्त पाळणे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, मात्र प्रशासनाने अनेक ठिकाणी ढिलाई दाखवली आहे. या महामारीच्या संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे. टाळेबंदी ठेऊनही रुग्णसंख्या वाढते आहे.
मृत्यूदर आणि मृत्यूसंख्येत गल्लत होत आहे. रत्नागिरी सारख्या छोट्या जिल्ह्यात दरदिवशी 20 ते 30 जण मृत्यू पावणे ही संख्या मोठी आहे. त्यामुळे मृत्यूदर ही फसवी संज्ञा ठरते. आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन रत्नागिरीतील रुग्णांच्या उपचाराची पद्धती यावर विचार होऊन आढावा घेऊन आवश्यक ती उपचारपद्धती, औषधोपचार यामध्ये बदल करणे अतिशय आवश्यक आहे. रुग्ण सापडल्यानंतर ट्रॅकिंग करून त्या त्या व्यक्तीची तपासणी अनिवार्य आहे. गतवर्षीच्या पहिल्या लाटेमध्ये ज्या पद्धतीने ट्रॅकिंग करून तपासणी व कंटेन्मेंट झोन तयार करून त्याची अंमलबजावणी केली गेली याच पद्धतीने अंमलबजावणी व्हावी. गाव पातळीवर ग्राम कृतीदल अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. ग्राम कृतीदलांना सूचना देऊन त्यानुसार अंमलबजावणीसाठी व्हावी. तशीच रचना शहरातील प्रत्येक प्रभागासाठी निश्चित करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
*कोविड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टर, सुविधा हव्या*
कोविड सेंटर उघडण्याची स्पर्धा सुरू आहे. मात्र या सर्व कोव्हीड सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी, स्थानिक डॉक्टर, परिचारिका पर्याप्त संख्येत उपलब्ध नाहीत. परिणामी तेथे अॅडमिट रुग्णांची तपासणी देखभाल, औषधोपचार योग्य होत नाहीत. या सेंटरमधून येणारे अनेक रुग्ण गंभीर होत आहेत. म्हणूनच प्रत्येक कोविड सेंटरमध्ये तज्ञ प्रशिक्षीत डॉक्टर नी रुग्णाची तपासणी करणे अनिवार्य करावे, अशी सूचना अॅड. पटवर्धन यांनी केली आहे.
*घाईत निर्णय घ्यायचा, कोणाच्यातरी निर्देशाने बदलायचा*
प्रशासनाचे निर्णय धरसोड वृत्तीचे झाले आहेत. प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे. दडपणाखाली निर्णय घेणे व बदलणे यामुळे प्रशासनाची पुरती नाचक्की झाली आहे. निर्णय घाईघाईने घेऊन घोषित करायचे आणि नंतर कोणाच्या आदेशानुसार ते बदलायचे हा खेळ रोज सुरू आहे. पालकमंत्री म्हणून या जिल्ह्या साठी आपण पुरेसा वेळ द्यावा. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल सुरू असल्याने जिल्हाधिकारी व त्यांची टीम यांना अनेक अधिकार प्राप्त आहेत. त्यांच्या अधिकारामध्ये जाणीवपूर्वक हस्तक्षेप होताना दिसत आहे. या सर्वांमुळे महामारीच्या कठीण प्रसंगात प्रशासन कर्तव्य, कठोर कारवाई करताना दिसत नाही. परिणामी ढिसाळ व्यवस्थापन, गोंधळाचे वातावरण कमालीची अस्वस्थ मनःस्थिती या सर्व गोष्टी कोरोना परिस्थिती अधिक गंभीर करत आहेत. त्यामुळे आपण दररोज रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घ्यावा व योग्य निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी सूचना अॅड. पटवर्धन यांनी केली आहे.
*प्रशासनात बाह्य शक्तींचा हस्तक्षेप*
जाहीर होणार्या निर्णयामध्ये अपवादात्मक बदल होतील असे पहावे. प्रशासनाच्या सर्व यंत्रणा एकसंघपणे समन्वय दाखवत काम करतील हे पाहावे. प्रशासनामध्ये बाह्य शक्तींचा होणारा हस्तक्षेप तात्काळ थांबावावा. येथील वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घ्यावा. तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन रत्नागिरीत उपचार देणार्या डॉक्टर्सना उपलब्ध व्हावे. औषधोपचार पद्धतीचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यकतर सुधारणा सुचवण्यात याव्यात. मृत्यूसंख्या मर्यादित राहील, या दृष्टीने तात्काळ पावले उचलावीत.
*ग्रामकृतीदलांना सक्षम करा*
ग्राम कृतीदले अधिक सक्षम बनवत अधिक कृतिशील करावीत. प्रत्येक कोव्हीड सेंटरवर योग्य तज्ञ डॉक्टर, परिचारिका नियुक्त करून त्यांना त्यांची कर्तव्य बजावणे बंधनकारक करावे. प्रशासन यंत्रणेचा संपूर्ण समन्वय राहील, यासाठी योग्य निर्णय निर्देश संबंधितांना द्यावे. प्रत्येक आठवड्यात रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्दिष्ठ ठरवून द्यावे. एक महिन्यामध्ये रुग्णसंख्या अत्यल्प व्हावी, यासाठी यंत्रणा राबवावी.
पालकमंत्री म्हणून आपणाला हे पत्र तळमळीने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून लिहित आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जे जे सहकार्य नागरिक म्हणून एका राजकीय पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. मात्र आपण स्वतः या परीस्थितीकडे जातीने लक्ष द्यावे ही विनंती, अॅड. पटवर्धन यांनी केली आहे.