रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करबुडे बोगद्यात घसरलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रुळावर आणण्यात यश आले. यासाठी रेल्वेच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी एमएफडी तंत्राचा वापर केला. अत्याधुनिक यंत्रणांमुळे गाडीतील प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा म्हणून करबुडेची नोंद आहे. सुमारे साडेसात किलोमीटरच्या या बोगद्यात लाजूळच्या बाजूने एक किलोमीटर अंतरावर आतमध्ये राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन घसरले. सर्वाधिक डबे बोगद्यात होते. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांच्या मनामध्ये भितीचे वातावरणही होते. काहींनात गाडी दुर्घटनाग्रस्त असल्याची माहितीही नव्हती. अत्याधुनिक तंत्राचा रेल्वेतील वापर हाच त्याला एकप्रकारे कारणीभूत आहे. गाडीखाली दगड आल्यामुळे इंजिनची दोन चाकं रुळावरुन घसरली होती. अरुंद बोगद्यात जागा अपुरी असतानाही रेल्वेच्या तज्ज्ञ अधिकारी, कर्मचार्यांनी दुरुस्तीला सुरवात केली. इंजिन रुळावर आणण्यासाठी एमएफडी तंत्राचा वापर केला. यामध्ये इलेक्ट्रिक जॅकच्या साह्याने इंजिन हळूहळू वर उचलले जाते. त्याचा वेग अत्यंत हळूवार असावा लागतो. यामध्ये इंजिनचा पार्ट तुटण्याची शक्यता असते. जॅक लावून एक्सलला जोडलेली चाकं वर उठवण्यात आली. चाकं स्लायडींग करुन हळूहळू रुळावर ठेवण्यात आली. जॅक हा हवेच्या दाबावर चालत असतो. इंजिन रुळावर आणल्यानंतर पाचव्या बोगीजवळ अडकलेला भलामोठा दगड फोडण्याचे आव्हान होते. इंजिन रुळावर घेत असताना काही कर्मचारी दगड फोडत होते. त्यासाठी ड्रीलमशीनचा वापर करण्यात आला. तो दगड बोगीला अडकून पडलेला होता. यामध्ये ब्रेकर मशीनचाही वापर करण्यात आला.
दोन्ही गोष्टींसाठी सुमारे तीन तासाचा काळ लोटला. त्यानंतर अत्यंत कमी वेगाने ती गाडी हळूहळू बोगद्याच्या बाहेर आणली गेली. तुटलेले रुळही बदलण्यात आले. शनिवारी (ता. 26) सकाळी 10 वाजून 14 मिनिटांनी भोके येथे थांबलेेली कोचिवल्ली एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली. दुर्घटनाग्रस्त भागात गाडीचा वेग ताशी दहा किमी ठेवण्यात आला होता. गाडी बोगद्यात अडकल्यामुळे काम करणे अधिक कठीण होते, त्यावर रेल्वे कर्मचार्यांनी मात करत कमी कालावधीत मार्ग सुरळीत केला