(आरोग्य)
आपण आजकाल खाण्यामध्ये अनेक बदल पाहत आहोत, म्हणजेच कोणत्याही पदार्थासोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत किंवा कुठल्याही फळासोबत कोणताही पदार्थ खाणे. यामुळे असे होते की, पोटातील अपचन वाढते. पचन क्रिया बिघडते आणि आपल्याला याचा त्रास सुरू होतो. मग आपल्याला जेव्हा त्रास होतो, तेव्हा आपल्याला कळतच नाही की आपण आज असे काय खाल्ले आहे की, ज्यामुळे आपल्याला एवढा त्रास होत आहे. आणि हे खाण्याचे परिणाम इतके भंयकर होतात की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही.
कधी कधी आपण दोन प्रकारचे पदार्थ वेगवेगळे खाल्ले तर त्यापासुन काही हानी होत नाही. पण असे काही पदार्थ आहेत, जे एकत्र नाही खाल्ले पाहिजेत आणि नेमके तेच पदार्थ एकत्र खाल्ल्यास त्याचे विषामध्ये रूपांतर होते. आणि याचे परिणाम काही वेळा लगेच आणि काही वेळा कालांतराने दिसुन येतात. अशा या एक आणि दोन पदार्थ किंवा याहुन अधिक अशा मिक्स पदार्थांच्या सेवनाला ‘विरूध्द आहार’ म्हटले जाते.
आजकाल हॉटेल्समध्येही तर असे प्रकार बहुतेकदा पहावयाला मिळतात, आणि आपण घरात देखील नकळत असे पदार्थ बनवतो. जे आपल्याला माहित नसते. कोणते फळ किंवा कोणत्या भाज्या एकत्रित खाल्ल्याने आपल्याला व आपल्या घरातील व्यक्तींना त्रास होऊ शकतो. तर आपण या लेखामध्ये अशाच काही विरुद्ध आहार लिस्ट मधील पदार्थ, भाज्या व फळांविषयी माहिती बघणार आहोत जी माहिती निश्चितच सर्वांना उपयोगी ठरेल.
दुधा सोबत हे पदार्थ खाणे टाळा – (दुध/ दुद्धजन्य पदार्थ आणि विरुद्ध पदार्थ)
१) दही तुमच्या आहारात असणे चांगले आहे आणि गरजेचे देखील आहे. परंतु शक्यतो रात्रीच्या जेवणात दही खाऊ नये.
२) अनेकांना अननस आवडते तसेच त्याचा ज्यूस देखील बरेच लोक आवडीने घेतात. तर या अननसाचा ज्यूस जर तुम्ही घरी करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अननसाचा ज्युस करताना त्यामध्ये दुध घालु नये. विरुद्ध आहार लिस्ट मध्ये अननस आणि दूध यांचा समावेश होतो.
३) अनेकांना खिचडीवर दही किंवा दूध घेऊन खायची सवय असते. दही खिचडीवर घेतल्यास चव देखील छान लागते, परंतु एक गोष लक्षात ठेवा की दही आणि दुध खिचडी वर एकत्रित करून कधीही खाऊ नये. दूध, दही आणि खिचडी यांचा एकत्रित वापर हा विरुद्ध आहार लिस्टमध्ये येतो.
४) आजकाल लोक कोणत्याही भाजीची त्तरी / ग्रेव्ही वाढविण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर करतात आणि आधीच आपण तेलामध्ये अनेक मसाले टाकलेले असतात. त्याने होते असे की दुध आणि मसाल्यांचे मिश्रण हेाते आणि शरीरावर दुष्परिणाम होतो.
५) मटन, चिकन, मासे आणि यांसोबत दुध घेणे टाळावे, कारण मटण चिकण आणि मासे हे उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत. तर दुध हे थंड असते, त्यामुळे दुध आणि मासांहार याचे मिश्रण होऊन याचे दुष्परीणाम होऊ शकतात.
६) दूध / दहयासोबत सुध्दा फळे खाल्ल्यास कफ वाढतो, आपण ज्यूस सेंटर ला जो ज्यूस घेता तिथे देखील जवळपास प्रत्येक फळाचा ज्यूस बनवताना त्यामध्ये फळासोबत दूध घालतात आणि असे फळ आणि दूध मिक्स केलेले ज्यूस सतत पिल्याने कफ तर वाढतोच. तसेच हदयविकारासारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो फळे तशीच खाल्लेली कधीही चांगली.
७) दुधासोबत फणस सुध्दा खाऊ नये, हा देखील विरुद्ध आहारच आहे.
८) दही कधीच गरम करून खाऊ नका. दहयाची कढी बनवुन खाल्ल्यास काही त्रास होत नाही.
विरुद्ध आहार लिस्ट मधील इतर पदार्थांची माहिती
१) सकाळी उठल्या उठल्या अनुषापोटी सिताफळाचे सेवन करू नये. तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या चुकून सीताफळ खाल्ले तर त्याने सर्दी, खोकला, घसा बसण्याचा त्रास होतो.
२) तांदळाचा भात आणि रात्रीच्या उरलेल्या चपात्या सहसा आपण सकाळी फोडणी देऊन नाश्ता म्हणून खातो. हे दोन्ही पदार्थ सकाळी वेगवेगळे खाल्यास काही हरकत नाही, परंतु जर तुम्ही हे दोन्ही पदार्थ म्हणजेच शिळा भात आणि चपाती एकत्रित फोडणी देऊन सकाळी नाश्त्याला खात असाल तर मात्र प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सहसा असे दोन्ही शिळे पदार्थ एकत्रित फोडणी देऊन खाऊ नका.
३) मुळा हा आपल्या शरीरासाठी गुणकारी असला तरी मुळा आणि उडीद डाळीचे वरण एकत्र जेवणात खाऊ नये. याने देखील अपाय उद्भवतात. त्यामुळे मुळा आणि उडीद हे विरुद्ध आहार लिस्ट मध्ये येतात.
४) केळी खाल्लेली आपल्या शरीराच्या पचनक्रियेसाठी लाभदायी असते. परंतु रात्रीच्या वेळी केळी खाणे शक्यतो टाळावे.
५) तूप टाकून आपण काही पदार्थ बनवत असतो तर काही तेलामध्ये. तेल आणि तूप वेगवेगळे खाल्ल्यास काहीच हरकत नाही परंतु आपण तूप आणि तेल एकत्रित खाऊ नये, तेल आणि तूप एकत्रित विरुद्ध आहार लिस्ट मध्ये येतात, याने देखील अपाय होतो.
६) तुप हे सगळयात पौष्टीक आहे. पण तुप आणि मध एकत्रित किंवा समप्रमाणात खाल्ल्यास विष तयार होते. तसेच तुप बनवुन तांब्याच्या भांडयात कधीच ठेवु नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले तूप देखील आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते.
७) ब-याचदा आपण टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर करतो, पण ही देखील चांगली गोष्ट नाही. टोमॅटो आणि काकडीच्या एकत्रित सेवनाने पोट फुगते आणि गॅस तयार होवुन बराच त्रास होतो. त्यामुळे शक्यतो यांचे सेवन एकत्रित करू नये.
८) तसेच आपण बर्याचदा पालकाच्या भाजीत कांदा टाकतो. पण पालक आणि कांदा एकत्रित खावु नये ते तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.
९) कोल्ड्रिंक्स म्हणजेच मिरींडा, माझा, फ्रुटी यांसारखे थंडपेय पितांना खुप लोक यासोबत चवीला म्हणून नमकीन शेंगदाणे खातात. पण असे केल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. कारण थंडपेयासोबत खारट पदार्थ खाल्ल्यास सोडीयम झपाटयाने वाढते आणि पाण्याचे प्रमाण शरीरातील झपाटयाने कमी होते, म्हणजेच तुम्हाला डीहायड्रेशन होते. आणि डीहायड्रेशन सारख्या गोष्टींमुळे चक्कर येणे, उलटया होणे आणि जीवाची तगमग वाढणे म्हणजेच जीव घाबरल्यासारखा होणे यांसारख्या गोष्टी होतात.
१०) उन्हाळयाच्या दिवसांमध्ये खुप पाणी प्यावे वाटते आणि थंड पाणी प्यावे वाटते. पण जर आपण कुठुनही भर उन्हातुन बाहेरून फिरून आला असाल आणि घरी आल्यावर कितीही तहान लागली असेल, तरी पाणी आल्या आल्या लगेच पिऊ नका. याचे खुप भंयकर परिणाम होतात. भर उन्हातुन आल्यावर पंधरा ते वीस मिनीटांनी आणि ते ही शांतपणे बसुन आणि हळुवारपणे पाणी प्यावे असे केल्यास कुठलाही त्रास होणार नाही.
११) रात्रीच्या वेळी सातुचे पीठ खाऊ नये आणि सातुचे पीठ पाण्यात मिसळुनच खावे. उन्हाळयात खाल्लेले कधीही चांगले.
१२) उन्हाळा म्हटले की, आपण उन्हाळ्यातील खास फळ कलिंगड म्हणजेच टरबुज हे खातोच. पण या टरबूजासोबत कधीही पुदीना किंवा थंड पाणी पिऊ नये. या तीनही गोष्टी एकसाथ घेतल्यास या विरुद्ध आहार लिस्ट मध्ये येतात.
१३) खरबुजासोबत लसुण, मुळा किंवा मुळयाची पाने खाऊ नयेत, हा देखील विरुद्ध आहार असून हे शरीरासाठी अपायकारक ठरतात.
१४) लिंबू, कारले आणि मीठ हे एकत्र दुधासोबत खाणे वर्ज करावेत. या गोष्टींच्या एकत्रित पाने विरुद्ध आहार म्हणून ओळखल्या जातात आणि याच्या सेवनाने शरीराला बरीचशी हानी होते.
वरील विरुद्ध आहार लिस्ट या लेखामध्ये काही अशा पदार्थांची माहिती दिलेली आहे की जे पदार्थ एकत्रित खाल्ल्याने आपल्या शरीराला त्वरित किंवा कालांतराने काही अपाय होतो. काही पदार्थ हे असे आहेत जे दुधासोबत खाणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. तर काही पदार्थ हे असे आहेत जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकत्रित खाल्याने मानवी शरीराला त्रासदायक ठरू शकतात. निरोगी शरीरासाठी वरील माहितीचे तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात पालन करणे अधिक हिताचे ठरू शकते.