( नवी दिल्ली )
जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नूरिएल रुबिनी यांनी २००८ मध्ये जागतिक मंदीचे अचूक भाकीत केले होते आणि याच कारणास्तव अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांना डॉक्टर डूम ही उपाधी दिली आहे. तर आता आगामी काळात भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अनेक मोठ्या देशांना पछाडेल, अशी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्रोफेसर आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नॉरिएल रुबीनी यांनी भारताबाबत भविष्यवाणी केली आहे. अर्थात भारत भविष्यात आर्थिक महासत्ता बनेल आणि विशेषत: यात चीनलादेखील पिछाडेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
आगामी काळात भारत ७ टक्के किंवा त्याहूनही वेगाने विकास दर गाठेल, असे रुबिनी यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप वेगाने वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन वर्षापासून लॉकडाऊनचा मार सहन करणा-या चीनच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावला आहे.
नोरिएल रुबिनी यांनी यापूर्वी २००८ मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा अचूक अंदाज वर्तवला होता. या मंदीनंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले. यात मोठ्या प्रमाणात नोक-यांचे नुकसान झाले. तेव्हापासून नुरिएल रुबिनीला डॉ. डूम म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. त्यांचा अर्थशास्त्रातील अभ्यास व्यापक असून, ते भविष्यातील अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज मांडतात. पुढचा काळ भारताचा असेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.