(अहमदनगर)
सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात आता १५ मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, असे ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.
जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाच्या धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढेसुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्रकल्पाबाबत भूसंपादनात येणा-या अडथळ्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच वाळू धोरणाबद्दल चर्चा झाली. शाळा प्रवेशासाठी विविध दाखले लागतात, त्यात सुलभता येणार आहे. तसेच सौर ऊर्जा हादेखील महत्वाचा विषय आहे. लवकरच शेतक-यांना सलग १२ तास वीज देता येणार आहे. पुढील ६ महिन्यांत बांध, शिवरस्ते याबाबत मिशन मोडवर काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाळू लिलाव पद्धत बंद करणार
वाळू माफियांच्या प्रश्नावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, वाळू माफियांचा उच्छाद जो राज्यात झाला आहे. त्या विरोधात आपण काम करत आहोत. त्यामुळे लवकरच वाळू लिलाव पद्धत बंद करणार आहे. लिलाव पद्धतीमुळे चढ्या भावाने वाळू घ्यावी लागते. पण नवीन वाळू धोरणामुळे सामान्य लोकांचा फायदा होईल, असे विखे म्हणाले.