(मुंबई)
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच कोर्टाच्या तीन न्यायाधीशांनी शिवसेनेवरील निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता या कायदेशीर वर्चस्वाच्या लढाईला उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु आता कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत शिवसेनेबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे तोंडी आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर पुढच्या दोन सुनावण्या पार पडल्यानंतर ‘निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांनी घ्यावा’, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेतील आमदार आणि खासदारांची संख्या विचारात घेता शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बहाल केलं होतं.