(मुंबई)
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा ताबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर आता शिवसेनेचा कारभार ठाण्यात हलविण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन नव्हे, तर ठाण्यातील ‘आनंदाश्रम’ असेल, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच १९७४ मध्ये दादर पश्चिमेला शिवसेना भवनाची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून आजवर शिवसेनेचा कारभार या इमारतीतून सुरू होता. तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या वास्तूने आजवर अनेक नेते, पदाधिकारी घडवले. राज्यातील सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणूनही शिवसेना भवनाची ओळख होती.
मात्र, आता शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर पक्षाचा कारभार ठाण्यातून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही गटांत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमात असेल. आनंदाश्रम आजवर शिवसेना जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे कार्यालय म्हणून प्रसिद्ध होते. ठाण्यात शिवसेनेला बळ देण्याचे काम या वास्तूने केले आहे.