रत्नागिरी : कोरोना महामारीचा प्रकोप रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने आरोग्य सुविधा तोकडया पडत असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत भा.ज.पा. आ.प्रसाद लाड यांनी आपल्या अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून परकार हॉस्पिटल येथे १०० बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री बेड, व्हेंन्टीलेटर्स, ऑक्सिजन बेड तसेच दोन ऑक्सीजन प्लांट उभारण्याचे मान्य केले. तशी घोषणा विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत परकार हॉस्पिटल मधील कार्यक्रमात गेल्या महिन्यात करण्यात आली. ती साधनसामुग्री परकार हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आली असून सामग्रीची जोडणी पूर्ण होताच १०० बेड कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज होतील. त्यामुळे परकार हॉस्पिटलमधल्या तज्ञ डॉक्टरांची सेवा रत्नागिरीतील रुग्णांना अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध होईल.
सुमारे १ कोटीच्या आसपास किंमतीची ही साधनसामुग्री असणार आहे अशी माहिती ॲड. दिपक पटवर्धन, भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष यांनी दिली. तसेच रत्नागिरीसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आ. प्रसाद लाड यांनी उपलब्ध करून दिली. स्थानिक भा.ज.पा. पदाधिकारी डॉक्टर शिफारस घेऊन आवश्यकतर रुग्णांनाही ऑक्सीजन मशीन उपलब्ध करत असून ही मशीन रूग्णांसाठी संजीवक ठरत आहे. आ. प्रसाद लाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत कठीण प्रसंगात रत्नागिरी साठी केलेली ही मदत मौल्यावन असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.