(पुणे)
मंगळवारपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या HSC परीक्षा सुरू झाल्या आहेत. काल पहिला पेपर इंग्रजीचा होता. यात बोर्डाच्या कामकाजाचा अजब कारभार समोर आला आहे. कालच्या बारावी इंग्रजी परिक्षाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तरे छापून आली होती. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचीच बाब झाली आहे. यावरून विद्यार्थी व शिक्षकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
बारावी बोर्ड परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत A-३, A-४, A-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले. या संभ्रमावस्थेत काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोरी सोडत या प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत.
बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचनांसह जशीच्या तशीच प्रश्नपत्रिकेत छापून आली आहेत. या प्रश्नपत्रिकेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बारावी बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी व शिक्षकांकडून होत आहे.