(करिअर)
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे लवकरच ५७७ अधिकारी पदांची भरती होणार आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहेत. अंमलबजावणी अधिकारी (Enforcement Officer) आणि सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) या पदांसाठी ही भरती होणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील रिक्त जागा याद्वारे भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२३ अशी आहे.
upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार फॉर्म भरू शकतात. या पदांसाठी निवड परीक्षेद्वारे होईल. परीक्षेची तारीख, त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र याबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित अधिक माहिती वेबसाइटवर माहिती मिळू शकते.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी व आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावं. APFC (Assistant Provident Fund Commissioner) श्रेणीसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. सविस्तर सूचना लवकरच प्रसिद्ध होईल.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. परीक्षेचे विविध टप्पे पार केल्यानंतर अंतिम निवड केली जाईल. प्रथम लेखी चाचणी, त्यानंतर मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय चाचणी होईल. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची शेवटी निवड केली जाईल.