(नवी दिल्ली)
संसद रत्न पुरस्कारासाठी यावर्षी लोकसभा व राज्यसभेचे मिळून १३ खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या खासदारांमध्ये आठ लोकसभा आणि पाच राज्यसभेचे सदस्य आहेत. संसद रत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील खासदारांमध्ये डॉ. अमोल कोल्हे, हिना गावित, फौजिया खान व गोपाळ शेट्टी यांचा समावेश आहे. यामध्ये २ राष्ट्रवादीचे तर २ भाजप खासदारांचा समावेश आहे. २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
संसद रत्न पुरस्काराच्या नामांकणासाठी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्षपदी संसदपटू व नागरी समाजातील ज्यूरीची एक समिती स्थापन करण्यात आली होती. ज्युरीने विशेष पुरस्कार श्रेणी अंतर्गत दोन विभागांशी संबंधित स्थायी समित्या आणि एका प्रतिष्ठित नेत्याला नामनिर्देशित केले. या समितीमध्ये वरिष्ठ खासदार आणि नागरी समाजाचे सदस्यांचा समावेश होता.
१७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन २०२२ पर्यंत प्रश्न, विधेयके आणि सदस्यांवरील चर्चेदरम्यानच्या त्यांच्या कामगिरीवर या पुरस्काराचे नामांकन केले गेले आहे.
लोकसभेतील संसद रत्न पुरस्काराचे मानकरी –
काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजपच्या हिना विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता आणि राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.
राज्यसभेतील संसद रत्न पुरस्कार प्राप्त सदस्य –
सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा आणि राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची निवड करण्यात आली आहे. विश्वंभर प्रसाद निषाद (सप) आणि छाया वर्मा (काँग्रेस) यांना त्यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सेवानिवृत्त सदस्य श्रेणी अंतर्गत नामांकन देण्यात आले आहे.
अर्थ समिती (लोकसभा समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा) आणि परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती (राज्यसभा समितीचे अध्यक्ष व्ही विजयसाई रेड्डी, वायएसआर काँग्रेस) यांना सध्याच्या लोकसभेच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे.