(कोल्हापूर)
कॉ. गोविंद पानसरे, अंनिसचे नरेंद्र दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकच्यांचा शोध घेण्यात सरकार अपयश ठरत असल्याने भाकपह समविचारी संघटनांनी पानसरे यांच्या आठव्या स्मृतिदिनी मोर्चाद्वारे “जवाब दो” आंदोलन करत सरकारचा निषेध केला. तपासकामात प्रगती न झाल्यास राज्यशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये खुनी हल्ला झाला. त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये पानसरे यांचा उपचार सुरू असताना २० फेब्रुवारी २०१५ ला मृत्यू झाला. तत्पूर्वी नरेंद्र दाभोलकर यांचाही अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. काही विशिष्ट संघटना लोकांचा गट या खुनाच्या पाठीमागे असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते, पण पुढे काही प्रगती झाली नसल्याने पानसरे यांच्या आठव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या मोर्चाचे आयोजन केले होते.
दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसरही कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन दणाणून सोडला. एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो, राज्य सचिव सुभाष लांडे, उदय नारकर, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, डॉ. मेघा पानसरे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे आदींसह विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.