(मुंबई)
गेले काही दिवस भाजप प्रवेशाच्या वावड्या उठत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या हालचालींवर मुंबई आणि नांदेडमध्ये खासगी व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार नांदेड पोलिसांकडे केली आहे. अशोक चव्हाण कुठे चालले, गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखे संपवा, अशीही चर्चा सुरू आहे, असे खळबळजनक विधान अशोक चव्हाण यांनी नांदेड पोलीस अधीक्षकांपुढे केले आहे.
यामागे माझा घातपात घडवण्याचे कारस्थान असावे, असा संशय व्यक्त करीत या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीरदृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. पाळत ठेवण्याबरोबरच मंत्रीपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केली असल्याची तक्रारही चव्हाण यांनी केली आहे. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून आणि मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केलेत, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.