(मनोरंजन)
‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांना अमेरिकेतील न्यू जर्सी आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवात नुकताच उत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘ग्लोबल आडगाव’ हा चित्रपट देश-विदेशात नावलौकिक प्राप्त करत असून आतापर्यंत १० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून दोन चित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाले आहेत.
‘ग्लोबल आडगाव’ या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्युजर्सी मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती खानदेशचे भूमिपुत्र उद्योजक अमृत मराठे यांनी केली असून, कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट देशविदेशातील अनेक नामांकित लोकांनी पाहिला अन् उदंड प्रतिसाद दिला. अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये यांच्या भूमिका असलेल्या ‘ग्लोबल आडगाव’ मध्ये शेती, माती, ग्रामसंस्कृतीबरोबरच जागतिकीकरणाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी यावर भाष्य करण्यात आलेले आहे.
भावनिक आणि संवेदनशील विषयाला या सिनेमाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आला असून या चित्रपटात ग्रामीण संवाद तसेच म्हणींचा सुरेख वापर करण्यात आला आहे. गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गायलेली कथेला पुढे घेऊन जाणारी अनेक गाणी चित्रपटात आहेत. अस्सल ग्रामीण बाज आणि विनोद या चित्रपटातून पहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. या सिनेमाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला होता.
अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी ४ लघुपट दिग्दर्शीत केले असून ३९ एकांकीका, ६ नाटके, १२ पथनाट्य लिहिली आहेत. यापूर्वी साळवे यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा रां .श. दातार पुरस्कार मिळालेला आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन हा उद्देश समोर ठेऊन निर्माते मनोज कदम यांनी ६७२ पेक्षा जास्त कलाकारांना घेऊन हा सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘ग्लोबल आडगाव’ हा एक कौटुंबिक सिनेमा असून यात मंत्रमुग्ध करणारे विचार तसेच नितांत सुंदर ग्रामीण प्रेम कहाणी असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. लवकरच हा सिनेमा रुपेरी पडद्यावर येणार आहे