(पुणे)
अनेक महिने चर्चेत असलेल्या सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव तसेच पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. पक्ष व पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील पक्षाचे कार्यालयही ताब्यात घेतले. त्यानंतर शिंदे गट शिवसेना भवन व पक्षाच्या अन्य संपत्तीवरही दावा करणार असल्याचे बोलले जात होते. काही नेते तसा दावाही करत होते. मात्र आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देत शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही त्यांच्या कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही.
We are taking forward the ideology of Balasaheb Thackeray. We have no claim on any of his property. We will take the state forward. People know what they (Uddhav Thackeray faction) did to get his property: Maharashtra Chief Minister Eknath Shinde pic.twitter.com/FbWkGL9gwj
— ANI (@ANI) February 20, 2023
मुख्यमंत्री शिंदे कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने मेरीटवर निर्णय घेतला आहे. त्यावर आक्षेप घेणे किंवा टीका करणे चूक आहे. आम्ही शिवसेना आहोत यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर दावा करायचा नाही. आम्हाला त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा मोह नाही, असे शिंदे म्हणाले.
शिंदे गटाच्या ताब्यात स्थानिक पातळीवरील शिवसेना शाखा जाऊ नये, यासाठी ठाकरे गटही आक्रमक झाला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर पडदा टाकण्याची भूमिका जाहीर केली आहे. नुकतीच दापोलीमध्ये शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. यावरून दापोलीमध्ये शिंदे व ठाकरे गटामध्ये तुफान राडाही झाला होता. राज्यात अन्य ठिकाणी असे प्रकार घडू नयेत यासाठी एकनाथ शिंदे यांनी गटाच्या मालमत्तेबाबत आपला निर्णय जाहीर केला आहे.