मुंबई : दिल्ली घडामोडीनंतर खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गेल्या १० दिवसांत तीनवेळा बैठक झाली. पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे, देशासह राज्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच, मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय रद्द केल्याने महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.