(खेड / प्रतिनिधी)
देवाचे दर्शन घेऊन घरी चालत जाणाऱ्या महिलेला गाडीत बसवून सोडतो असे सांगून वृध्द महिलेचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना पर्शुराम पिरलोटे खेड येथे घडली. याबाबतची फिर्याद सविता रामचंद्र आंब्रे (65, व्यवसाय गृहीणी, रा. आंब्रेवाडी, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 18 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आंब्रे या इतर महिलांसह देवदर्शनासाठी गेल्या होत्या. पर्शुराम ते पीरलोटे अशा घरी जात असताना या महिलांनी पांढऱ्या रंगाच्या कारला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार चालकाने गाडी थांबवताच इतर महिला मागच्या सीटवर व सविता आंब्रे या पुढच्या सीटवर बसल्या. त्यांच्या बाजूला एक अनोळखी महिला बसली होती. तिने ‘मावशी गर्मी किती होतेय’ असं म्हणत स्वतःच्या गळ्यातील ओढणी काढून सविता आंब्रे या वृध्देकडे दिली. त्यानंतर त्या महिलेने पीरलोटे येथे तुम्ही उतरा असे सांगून आंब्रे व इतर महिलांना कारमधून उतरवले. मात्र कारमधून उतरताच सविता आंब्रे यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसून आले नाही.
गळ्यातील ओढणी काढताना आपले मंगळसूत्र लांबवल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. आपले मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात येताच आंब्रे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेवर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.