( मुंबई / निलेश कोकमकर)
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी चि.सौ कां.रुचिता वीर सह चि.सतिश निर्मळ ( गाव पत्ता कळंबट घवाळेवाडी -चिपळूण) यांचा शुभविवाह के के मार्ग महालक्ष्मी येथे पार पडला. दरम्यान नवरी मुलगी घराकडून लग्न मंडपाकडे जाण्यासाठी टॅक्सीने निघाली. टॅक्सी मध्ये ४ प्रवासी असल्यामुळे लग्नाच्या सामानाची बॅग टॅक्सीच्या वर ठेवली आणि लग्न मंडप जवळ येताच सर्व वराडी उतरले आणि ती बॅग काढून घ्यायची राहून गेली. त्या घटनेला जवळजवळ एक तास होऊन गेला होता. जेव्हा लग्न विधीच्या वेळी दागिने आणि लग्न विधीला लागणारे साहित्यची गरज भासली तेव्हा लक्षात आलं की ती बॅग टॅक्सीच्या वरच राहिली आहे. हे समजताच नवरी मुलीचे आई वडील अगदी खिन्न होऊन रडकुंडीला आले. आणि ते साहजिक होते, जो खर्च मुलीच्या लग्नासाठी केला ते असे अचानक गायब होणे अनपेक्षित होते.
घरातील मंडळीना हे समजताच समीर वीर, महेश वीर, अनिल वीर, सुरेश सुर्वे, शांताराम वीर, धीरज शिंदे , हर्षल चांदोस्कर,अमोल वीर, रमेश वीर यांनी थेट आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठले व सोनम वीर आणि माहिती अधिकार, पोलीस मित्र -पत्रकार संरक्षण सेनेचे सदस्य निलेश कोकमकर यांनी विभागातील ट्राफिक कंट्रोल पोलीस ठाणे मध्ये भेट दिली. परंतु टॅक्सीचा नंबर सुद्धा कुणाच्याही लक्षात नसल्याने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात जाऊन cctv कॅमेरा तपासण्यात आले, त्यावेळी ज्या टॅक्सीवर बॅग होती ती दुपारी १२.३६ वाजता सात रस्ता सर्कल जवळ उभी असताना दिसली. त्यावरून आग्रीपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई श्री. रविराज बोरसे यांना दोन तासाच्या अथक प्रयत्नाने टॅक्सीवाल्यापर्यंत पोहचता आले. त्यांनी त्याचा नंबर मिळवला आणि टॅक्सीसहित आग्रीपाडा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब ना करता टॅक्सीवाला पोलीस ठाण्यात पोहचला. बॅग ठेवली होती तिथेच होती आणि बॅग टॅक्सीवर राहिली आहे हे त्या चालकालाही माहीतच नव्हते, असे त्याने सांगितले. नवरा नवरीच्या आई वडिलांचे नशीब आणि त्या टॅक्सीवाल्याची इमानदारी म्हणून तब्बल दोन तासाने ती बॅग पोलिसांच्या मदतीने मिळाली आणि वधू – वर कुटुंबीयांनी सुटकेचा स्वास सोडला व पुढील लग्न कार्य सोपस्कर पार पडले.
चौकशी बाजूच्या दरम्यान आग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळी कार्यरत असलेले येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी श्री. योगेंद्र पाचे, API योगेश पाते, गुन्हे प्रकटीकरण पथक – स.पो.नि. श्री पाटील, ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्री . संदीप गळंगे, पोलिस शिपाई श्री. रविराज बोरसे आणि पोलीस सहकारी आदींनी ही बॅग परत मिळविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आणि अथक प्रयत्न करून ती बॅग आणि सर्व सामान आहे का तपासून त्या कुटुंबीयांच्या हाती सुपुर्द केली. तर टॅक्सीवाल्याचे आभार म मानून त्याला कुटुंबीयांच्या तर्फे बक्षीस देऊन सोडण्यात आले. यावेळी वधू – वर कुटुंबीयांनी समस्त पोलिस अधिकारी मित्रांचे आभार मानले.