(रत्नागिरी)
रत्नागिरी श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाला ६ मार्चला प्रारंभ होणार आहे. यासंदर्भात रविवारी अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव भैरव मंदिरात झालेल्या वार्षिक बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी रात्री १० वा. सहाणेवरून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपरिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री ठिक ११ वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिरा बाहेर पडेल व खालची आळी, बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाणार आहे.
७ मार्च २०२३ रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, कॉंग्रेस भुवन, मुरलीधर मंदीर, बंदर रोड मार्गे पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल . तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चंवडे वठार, खडपे वठार मागील समुद्र मार्गाने जाऊन पुढे शेटये यांचे घराजवळ रस्त्यावर येऊन खडपेवठारातून गोडीबाव तळयावर सकाळी १० वाजता येणार आहे.
तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे सकाळी ११.३० वाजता येईल तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी १२ वाजता येईल. तेथून पुढे गाडीतळावरुन शेरेनाक्यावरुन शिवाजी हायस्कूल शेजारी श्री नरेंद्र सांवत यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यंत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन तेथे होळी उभी केली जाईल.
७ मार्च रोजी रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरुन निघेल व सांवतखोत वठारातून पटवर्धन यांच्या घरापर्यंत जाऊन फिरून येईल व देवस्थानचे मुख्य खोत रमाकांत गोपाळ सांवत व संतोष आत्माराम सांवत यांच्या घरी जाईल तेथे पूजा अर्चा होऊन धुळवड श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर (दिवटीवाले मानकरी) यांच्या कंपाऊड मध्ये जाऊन सुर्वे यांच्या बागेतून शिवलकर वगैरे यांच्या घराजवळून कुभांरवाडयातून परटवणे फगरवठार येथून परत फिरुन निशाण वरच्या आळीतून, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनिच्या पारावर येणार आहे. सुमारे रात्री ११.३० वा. ढमालनिच्या पारावरुन निशाणाचे तीन भाग होतील. त्यापैकी एक भाग निशाण घेवून गुरव मंडळी श्रीदेव भैरी मंदिरामध्ये जातील. दुसरा भाग गोखले नाक्यावरून राधाकृष्ण ना मासळी बाजारपेठ येथे जाईल, तेथे रवी सुर्वे, मयेकर यांच्या घराच्या दरम्यान फिरून मच्छि मार्केटच्या मागील बाजूने झारणी रोड मार्गे राम नाक्यावरून टेलीआलीत रसाळ यांचे घरी तिठ्यावरती येईल.ढमाळणीच्या पारावरून तिसरा भाग निघून पऱ्याची आळी, मारुती आलीतून ते येथील रसाळ यांचे घरी तिठ्यावर येईल.
गोडीबाव नाक्यावरुन श्री देसाई यांचे घरी जावून, खडपेवठार येथे देसाई व विलणकर यांचे शेतातून रघू विलणकर यांचे घरी जाईल तेथून निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात जाईल (सुमारे १.३०वा.) तेथे श्रीदेव विश्वेश्वराच्या हद्दीत फिरुन श्रीदेव विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गा-हाणे होईल व निशान बाहेर पडेल . तेथून राजीवडयातील चव्हाण यांच्या घराशेजारी जाईल. तेथे मुस्लीम मानकरी श्री काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देवून गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. तेथून निशाण परत फिरुन खडपेवठार सतीजवळून, चंवडे वठार नाक्यावरून, विलणकरवाडी, श्री. दत्त मंदिर नाका, घुडे वठार, मांडवी येथे वारंग यांचे घरी रात्री थांबेल.
४ दिवस पालखी सहाणेवर
८ मार्च २०२३ सकाळी ८ वाजता मांडवी वारंग यांचे घरापासून. पुढे चौगुलेवाडी समुद्रमार्गे पौडा वरुन कुरणवाडी, सिध्देश्वर विरेश्वर चव्हाटयाजवळ गा-हाणे होईल. तेथून धुळवड श्री आंबुलकर यांच्या घरी जाईल. आंबूलकर यांच्या घरातून सांबमंदिर, ज्योतीबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होवून एक भाग राममंदिरच्या मागील बाजूने जाऊन दुसरा भाग राममंदिराच्या पुढिल बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येवून तेथून पुढे भैरी मंदिर, सुभेदार यांच्या घराजवळून पाटिल फिशरीज फॅक्टरी जवळून विठलादेवी जवळून ग्रामस्थ शिरधनकर यांच्या घरी जाईल. तेथून मुरुगवाडा घसरवाटेजवळ धुळवडीचे दोन भाग होतील. एक भाग झाडगाव येथील झाडगावकरांच्या कंपाऊंडमध्ये येईल व दुसरा भाग तेथून पुढे पंधरा माड येथील पिलणकर यांच्या घरी जाईल. नंतर मुरुगवाडा हद्दीजवळ जावून तेथे गा-हाणे होवून धुळवड परत मागे फिरुन झाडगांव सहाणेजवळील झाडगावकर दिवटीवाले यांच्या कंपाऊडमध्ये दुपारी १२ वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल. बुधवार ८ मार्च २०२३ ते ११ मार्च २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीदेव भैरी ची पालखी झाडगांव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल.
११ मार्चला पालखी सहाणेवर तसेच ८ मार्च २०२३ ते ११ मार्च २०२३ च्या रात्री १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक वाडी तर्फे पारंपरिक पध्दतीत पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. ११ मार्च २०२३ रोजी दु. १२.०० वा. श्रीदेव भैरीची पालखी मुरुगवाडयात ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरून उठेल व झाडगाव मार्गे, श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिर मार्गे दांडाफॅक्टरीचे मागील बाजूने मुरुगवाडयातून पंधरा माडापर्यंत जाऊन परत मागे फिरेल व रात्री साधारण १०.०० वाजता झाडगाव सहाणेवर येईल, त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल.
१२ मार्चला रत्नागिरीतील शिमगोत्सवाची सांगता
१२ मार्च २०२३ (फाल्गुन पंचमी) (रंगपंचमी) श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी १ वाजता सहाणेवरून उठेल व पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेऊन वरच्या खोत वठारातून झाडगाव श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून खेडसकर सांवत कंपाऊडमधून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन खालच्या खोत वठारातून २.४५ वाजता झाडगाव नाक्यावर येईल तेथून पुढे गाडीतळ येथे ३.३० वाजेपर्यत येईल. पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सांय. ०४.३० वाजता पोहचेल. तेथून पुढे शहर पोलीस स्टेशनला पोहचेल, पुढे घनजी नाक्यावरुन, राधाकृष्ण नाक्यावर सायं. ०६.३० वा. येईल. पुढे राम नाका, राम मंदिर येथे सांय ०७ वा. येईल, पुढे मारुती आळी, गोखले नाक्यावरुन, ढमालनीच्या पारावर रात्री ९ वाजता पालखी येईल. तेथून पुढे विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, कॉंग्रेस भूवन, मुरलीधर मंदिर येथे रात्री १० वाजता पालखी येईल, पुढे खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात रात्री ११.३० वाजेपर्यत येईल. रात्री १२ वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल, नंतर धुपारत व गावाचे गाहाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होईल.