(मुंबई)
उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर अविश्वास ठराव आणला होता. तर मग माझ्या अध्यक्षतेखाली झालेली विधानसभा अध्यक्षांची निवडही चुकीची ठरते का? मी नेमलेला अध्यक्ष कसा चालतो, असा खडा सवाल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केला आहे.
ज्या सभागृहाने माझी उपाध्यक्षपदी निवड केली. त्याच सभागृहात माझ्याविरोधात अविश्वास ठराव येणं अपेक्षित आहे. मात्र तसे झालेले नाही. विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांवर साध्या एका नोटीसीने अविश्वास येत नसतो.
साध्या सरपंचावर अविश्वास दाखल करायचा असेल तरी नोटीस द्यावी लागते. त्याची पडताळणी होते त्यानंतर ज्यांच्यावर अविश्वास दाखविला गेला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. माझ्यावर अविश्वास दाखल करायचा असेल तर सभागृहातच जावे लागेल, तरच तो अविश्वास दाखल होऊ शकतो. आमदारांना मी दिलेली अपात्रतेची नोटीस योग्य नसेल तर माझ्या उपस्थितीत झालेली नव्या अध्यक्षांची निवड वैध धरता येईल का? असा सवाल नरहरी झिरवळ यांनी केला आहे.