(राजापूर)
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व अन्य सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिवंगत पत्रकार वारीशे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची ‘भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे याच्या संशयीत अपघाती मृत्यूनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विधान परीषदेचे विपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुटुंबीयाच्या शिवसेना आपल्या पाठीशी आहे, असेदेखील आश्वासन संजय राऊत यांनी कुटुंबीयांना दिले.
माझ्या शशीच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा, आईचा आकांत
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वारिशे कुटुंबाचे सांत्वन केले तेव्हा शशिकांतच्या आईचा आक्रोश ऐकून सारेच हेलावले. ‘माझ्या शशीच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा’ ही त्या वृद्ध आईची आर्त हाक राज्य सरकारच्या कानी पोहोचणार आहे का, हाच स्थानिकांचा सवाल आहे.
शशिकांतचे घर म्हणजे गरीबाचे घर. शशिकांतच्या अकाली मृत्यूने या घराचा सांदीकोपरा अजून दुःखात आहेत. घरात ७५ वर्षांची वृद्ध आई… जी गेली काही वर्षे अंथरुणाला खिळली आहे. तर पितृछत्र हरवल्यामुळे अनाथ झालेल्या कोवळ्या वयातील मुलगा यश… एवढीच माणसे आता कुटुंबात. दोघेही मनाने पार उद्ध्वस्त झाली आहेत. शिवसेना नेत्यांनी त्यांना धीर दिला तेव्हा हे दोघेही उन्मळून पडले होते.