(मुंबई)
शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्षावर सांगितलेला दावा केंद्रीय निवडणूक आयोगानं ग्राह्य धरला आहे. शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे यापुढं एकनाथ शिंदे गटाला वापरता येईल, असा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे. त्यानंतर आता सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळालं ही आनंदाची गोष्ट. आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडं तीच खरी शिवसेना आहे. कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेना ताब्यात घेऊ शकत नाही. तेच खरं ठरलं आहे, असं फडणवीस म्हणाले.
मला आणि एकनाथ शिंदे यांना देखील हा विश्वास होता. आमदार आणि खासदारांची संख्या लक्षात घेऊनच हा निर्णय झालेला आहे असं दिसतंय. मी पूर्ण निकाल वाचलेला नाही. त्यामुळं त्याचं विश्लेषण आता करणार नाही, असं फडणवीस म्हणाले. तसेच या देशात न्याय, कायदा आहे, त्यानुसारच हा निर्णय झालेला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जरूर जावं, तो त्यांचा अधिकार आहे, असेही ते प[पुढे म्हणाले.