(मुंबई)
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी हलचल माजली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत हा निकाल म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह गोठवलं गेलं, त्यानंतर त्यांनी पंजा हे चिन्ह घेतलं, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, काही दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील, असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं होतं. पण आता केंद्र सरकारचं गुलाम बनलेलं आहे, निवडणूक आयोग हे चिन्हही काढून घेईल. तर समता पक्षाचे उदय मंडल यांनी म्हटलं आहे की, “मशाल” हे चिन्ह समता पक्षाचं असून ते मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा ठोकला जाईल. यामुळे शिवसेनेकडून मशाल हे चिन्हही जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.