रत्नागिरी : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत जी संभ्रमावस्था शासनातील लोकांकडून केली जात आहे त्याबाबत राज्य सरकारने वेळीच स्पष्टीकरण देऊन संबंधित यंत्रणा व जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी मागणी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंट आहे की नाही याबाबत शासकीय यंत्रणेतच संभ्रम आहे.आरोग्य मंत्री एक माहिती देत आहेत तर जिल्हाधिकारी दुसरी माहिती देत आहेत.सत्य लोकांना कोण सांगणार?असा सवाल सुहास खंडागळे यांनी केला असून आता रत्नागिरी जिल्ह्यात हा डेल्टा प्लस व्हेरियंट आहे की नाही हे त्यांचं त्यांनाच माहीत.पण रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना वेठीस धरणारा कोणता छुपा व्हेरीयंट आहे का?याचा शोध मात्र शासनाने घ्यायला हवा असा टोलाही सुहास खंडागळे यांनी नागरिकांत संभ्रम निर्माण करणाऱ्यांना लगावला आहे.
कोरोना नियंत्रणात यंत्रणा कमी पडतेय का?कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,चाचण्या वाढविणे आणि विलगीकरण हे योग्य पध्दतीने होतेय का?याचा शोध घेऊन सरकारने स्वतः पुढाकार घेऊन आता रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य माणसाला दिलासा द्यावा!त्यासाठी मुंबईतून एक विशेष टीम जिल्ह्यात पाठविण्यात यावी, एका विशेष आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती येथील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करावी असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.विद्यमान जिल्हाधिकारी यांनी मागील वर्षी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली, त्यांच्या त्यावेळच्या मेहनती मुळे पहिली लाट कोकणात नियंत्रणात आली होती मात्र दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासन नेमकं कुठे कमी पडत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.