(रत्नागिरी)
तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव सादर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र सदस्यांनी तहसीलदारांना दिले.
परस्पर कामे देणे, स्ट्रीट लाईट साहित्य खरेदीमध्ये अनियमितता, विकासकामात सदस्यांना विश्वासात न घेणे, मुलाचा ग्रामपंचायत कामामध्ये हस्तक्षेप, आदी कारणे देऊन दहा सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला आहे.
वाटदच्या सरपंच अंजली अनंत विभुते यांच्या विरुद्ध हा अविश्वास ठराव आणला आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये एकूण ११ सदस्य आहेत. मात्र दोन वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी आणि मनमानी कारभारामुळे सरपंच विभुते चर्चेत होत्या. त्यांच्या या कारभाराबाबत सर्व सदस्य एकवटले आहेत. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अंजली विभूते यांच्या विरोधात तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. १ विरुद्ध दहा असा अविश्वास ठराव मांडला आहे. यामध्ये १० सदस्यांनी आपली नावे आणि स्वाक्षरी करून कारणेही दिली आहेत.
यामध्ये १५ वित्त आयोग ग्रामपंचायत स्तरावरील निविदा व मक्तदेरांचा ठरावात उल्लेख न करता परस्पर कामे देणे, स्ट्रीट लाईट साहित्य खरेदीमध्ये अनियमितता, विकास कामे करताना कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता व कोणत्याही ठराव-निविदा न होता परस्पर देणे, सरपंचाचा मुलगा ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करतो, अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध घटकाचा विकास करणे याचा अयोग्य प्रस्ताव करणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांना परस्पर निलंबनाची नोटीस देणे, अशा मनमानी कारभाराविरुद्ध हा अविश्वास ठराव मांडण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.