(सांगली)
येथील कवठेमहांकाळ एसटी आगारामध्ये चालक म्हणून सेवेत असलेले भीमराव सूर्यवंशी यांनी गुरूवारी सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाचे रहिवाशी आहेत. सूर्यवंशी ग्रामीण मार्गावर चालक पदावर काम करत होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले, तरी त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे निम्मा फेब्रुवारी महिना उलटला तरी ८८ हजार एसटी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा डिसेंबरचा पगार झालेला नाही. यामुळे कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिंदे सरकारकडून वेतनासाठी २२३ कोटी
एसटी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी २२३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. पण एसटी महामंडळाला पूर्ण रक्कम न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ, ग्रुज्युईटीची रक्कम कापल जाणार नाही. एसटी दरमहिन्याला ३६० कोटी रुपयांची रक्कम देण्याची हमी राज्य सरकारने न्यायालयाला दिली होती. पण शिंदे फडणवीस सरकारने महामंडळाला एकदाही ३६० कोटी रुपयांची पूर्ण रक्कम दिलेली नाही.