(मुंबई)
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस उद्या शनिवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. शनिवारी दुपारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये त्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यामुळे पायउतार व्हावे लागलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी राजभवनातील कर्मचा-यांनी भावपूर्ण निरोप दिला.आज शुक्रवारी त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात येणार असून, त्यानंतर ते डेहराडूनला प्रयाण करतील.
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत, तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे वादळ उठले होते. अखेर त्यांनीच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मागणी मान्य करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे आज सायंकाळी मुंबईत आगमन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये त्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे.
रमेश बैस यांचा परिचय
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्य प्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदा-या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.