(मुंबई)
महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता पुरातत्व खात्यानं उत्तर प्रदेशातील आग्रा येथील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशनने आग्र्यातील किल्ल्यावर शिवजयंतील साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आता पुरातत्व खात्यानं शिवजयंतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत.
शिवजयंती चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पुरातत्व खात्यानं शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिल्यामुळं शिवभक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि यूपीच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहे. याशिवाय महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्त या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा भेटीत बोलावून त्यांचा भरदरबारात अपमान केला होता. त्यानंतर शिवरायांना औरंगजेबानं कैदेत ठेवलं होतं. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांनाही औरंगजेबानं आग्र्यातच कैदेत ठेवलं होतं. शिवरायांनी मोठ्या शिताफीनं औरंगजेबाच्या हातावर तुरी देत सुटका केली होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासात आग्र्याच्या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.