साठवणूक केलेल्या धान्यास कीड लागू नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंढे गावात चिमुकल्या सख्या लहान बहिण, भावाचा उलट्या व खोकल्याच्या त्रासानंतर मृत्यू झाला. मन हेलावणाऱ्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
श्लोक अरविंद माळी (वय ३ वर्षे) व तनिष्का अरविंद माळी (वय ७, दोघेही रा. मुंढे, ता. कराड) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवण्यासाठी त्यात पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे माळी यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.
अरविंद माळी यांच्या लहान मुलाला सतत उलट्या होत असल्याने त्याला सोमवारी कराडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारीच श्लोकचा मृत्यू झाला. तर मंगळवारी (१४ फेब्रुवारी) तनिष्काला उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तिलाही रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर शरीरामध्ये अंतर्गत अतिरक्तस्त्राव व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तनिष्काचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही. दोन्ही मुलांच्या आकस्मिक मृत्यूने माळी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.