(मुंबई)
पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरुन संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे तरीही ते असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही. कशाच्या आधारावर बोलले मला माहित नाही, असे शरद पवार म्हणाले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या या शपथविधीची राज्यभर चर्चा झाली होती. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता. २०१९ मध्ये सरकार स्थापन करताना शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. शरद पवारांच्या सहमतीनेच अजित पवार यांनी आमच्यासोबत सरकार स्थापन केले होते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.