( प्रतिनिधी / दापोली )
बैलाने मालकालाच ठार मारल्याची दुर्दैवी घटना दापोली तालुक्यातील पिसई-वझरवाडी येथे घडली. या घडनेने पिसई परिसर सुन्न झाला आहे. विठोबा घोले (65) असे बैलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोले हे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी सोडलेला बैल आणण्यासाठी वझरवाडी येथील नदीकिनारी गेले होते. गुरुवारी त्यांचा बैल पऱ्याकडे असल्याचा त्यांना फोन आल्याने ते घरी न जाता परस्पर बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी गेले, पण ते परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी रात्री शोधाशोध केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही, परंतु सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला, मानेला व छातीवर जखमा असल्याने बैलाने त्यांच्यावर जबर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चवताळलेल्या बैलाने त्यांच्या अंगात शिंगे खुपसली. तसेच पायांनी तुडवून काढले. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. दापोली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.