(मानसिक संतुलन भाग – १४)
गेल्या दोन आठवड्यापासून आपण मनास संतुलित करणाऱ्या योगिक भावनांचा विचार करीत आहोत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. आणि समाजात राहायचे असेल तर समाजाने निर्माण केलेले नियम हे पाळावेच लागतात. ते सगळेच आपल्याला आवडतात अशातला भाग नाही. परंतु समाजात रहायचे असेल तर काही बाबतीत आपल्याला तडजोड ही करावीच लागते.
मनाची शांती, सुरक्षितता तसेच अनेक बाबतीतल्या संतुलनासाठी आपल्याला समाजावर अवलंबून रहावे लागते. जोपर्यंत आपल्याला आत्मिक सुखाचा शोध लागत नाही तोपर्यंत आपले सुख आपण बाहेरच शोधीत रहातो. समाजातील अनेक व्यक्तींशी त्यानिमित्ताने आपला नित्य संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट विचारांनी आपण सतत प्रभावित होत असतो. प्रत्येक व्यक्तींचे विचार वेगळे असल्याने विचारांमध्ये संघर्षाचा अतिरेक होऊ नये म्हणून आपण आपल्या आणि समाजाच्या हितासाठी नाईलाजाने का होईना, वैचारिक मध्य साधलेला असतो. सर्वच व्यक्तींचे वागणे, बोलणे आपल्याला आवडते असे नाही. तरीही आपण ते काही प्रमाणात स्वीकारतो. कारण आपल्याला त्यांची गरज असते. सन्याशाला ती नसते. कोणतीही व्यक्ती मूलतः वाईट नसते. तिच्यावर झालेले संस्कार वाईट झालेले असतात. अशावेळी ज्याला स्वतःचा आत्मविकास करायचा असेल त्यास फार सावधगिरी बाळगावी लागते. ज्यांना आत्मशोध घ्यायचा असतो, त्यांनी बाहेरील घटकांत रमायचे नसते. परंतु हे शक्य होत नाही. कारण ज्या लोकांमध्ये त्याला राहायचे आहे त्यांची मते काही प्रमाणात स्वीकारावीच लागतात. अशी मते आपल्या उन्नतीस योग्य असतीलच असे नाही. त्यावर एक उपाय आहे, तो म्हणजे ‘साप मेला पाहिजे पण काठीही मोडता कामा नये.’ असे काहीतरी करता येईल का? याचा विचार करावा. आणि नेमके हेच काम योगिक भावना करतात. पाण्यात असूनही कमळाच्या फुलावर पाणी किंवा चिखल नसतो. तसे काहीसे आपल्याला ह्या संसारात वावरतांना करावे लागेल.
समाजात राहूनही आपल्या सभोवतालच्या परिस्थितीने किंवा लोकांमुळे प्रभावित न होणे सोपे नाही. त्यासाठी काही गोष्टी चिकाटीने शिकाव्या लागतात. त्यातील महत्वाचे म्हणजे लोकांमधील वर्तनाचे जे विविध भाव आहेत त्याचा नीट अभ्यास करायला हवा. ते भाव आत्मसात करण्याची कला आत्मसात करावी लागेल. मनुष्याने उत्तम नट व्हावे. काही ठिकाणी बेमालूम भूमिका वठवता आली पाहिजे. रामलीलेमध्ये राम आणि रावणाने स्टेजवर खुशाल भांडावे मात्र नाटक संपल्यावर आनंदाने चहा प्यावा. शो संपल्यावरही जर ते भांडतील तर ते चुकीचे ठरेल. आपणही आपल्या नैमत्तिक जीवनात वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो. त्या भूमिकेच्या अनुरूप आपले वर्तन असायला हवे. ह्या भूमिका न समजल्यामुळे अनेक वेळा संसारात भांडणे होतात. ही भांडणे इतकी विकोपाला जातात की जणू आपण कायमस्वरूपी इथेच राहणार आहोत असे वाटावे. साठ सत्तर वर्षाचे आजी आजोबा एकमेकांवर गुरगुरतांना पाहून आश्चर्य वाटते. इतकी वर्षे होऊनही ती दोघे एकमेकांना समजू शकली नाहीत. जीवन म्हणजे काय याची थोडीही कल्पना येऊ नये. याचे नवल वाटते. काही दिवसांची ही नाती असतात. त्यात न फसता आपण आपल्या उन्नतिकडे अधिक लक्ष द्यायला हवे. भौतिक जंजाळातून मुक्त व्हायला पाहिजे.
एखाद्या विषयी जर आपल्या मनात द्वेष युक्त विचार येत असतील तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक शक्तीवर होतो. त्यामुळे आपली मानसिक शक्ती क्षीण होते. याउलट चांगले विचार आपली मानसिक ताकद वाढवितात. तिला प्रोत्साहित करतात. कोणत्याही घटनेस प्रतिक्रिया देणे हा चित्ताचा स्वभावधर्म आहे. असे असेल तर ही प्रतिक्रिया नेहमीच सकारात्मक कशी राहील याचा अभ्यास करावा. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेल असे नाही. किंवा समोरील प्रसंग आपल्या उन्नतीस हानी पोहचवणारा असतो. अशावेळी काय करावे? एखादा कुशल फोटोग्राफरचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. समोरचे दृश्य कसेही असो त्यास सुंदर बनवण्याचे काम तो करतो. कसाही फोटो न घेता तो अँगल बदलतो. आणि तो अशा कोनातून फोटो घेतो की कुरूप वस्तूही सुंदर दिसते. अगदी तसाच दृष्टिकोन आपण समाजात वावरताना ठेवावा.
समोरच्या व्यक्तीबाबत आपण आपल्या मनात कोणती प्रतिमा ठसवावी हे आपल्याला त्वरित ठरवता आलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे जग हे भिन्न असते. त्याच्या जगतात किंवा व्यक्तीमत्वात आपल्याला पडण्याचे काहीच कारण नाही . आपले लक्ष आपल्या उन्नतिकडे असायला हवे. आपल्या प्रगतीच्या आड असा कोणताही बाह्य घटक येऊ नये म्हणून आपल्या चित्तास नेहमी सकारात्मक विचारांची सवय लावावी. याच्या उलट झाले की नकारात्मक प्रतिमा आपल्या मनात उमटते. व ती आपल्या मनाचे खच्चीकरण करते. ज्याने अध्यात्मिक क्षेत्रात पाऊल ठेवले किंवा आपल्या आत्मविकसाकडे वाटचाल सुरू केली त्याने आपल्या समोर येणाऱ्या व्यक्तीशी कसे वागावे हे आधीच ठरवायचे असते. त्यात फार वेळ न घालवता आपल्या मार्गात पुढे सरकायचे असते. अशा पद्धतिने आपल्या वाटचालीत आपल्या मनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही यासाठी तिसरी भावना जी मुदीता फार उपयोगी ठरते.
एखाद्याचे काही चांगले झाले, किंवा त्याने फार उत्तम यश मिळविले हे पाहून सुरवातीला आपल्याला बरे वाटते. त्याच्या आनंदात काही काळ आपण सहभागीही होतो. परंतु काही वेळाने आपल्या मनात असाही विचार येतो की ह्या गोष्टी आपल्याला का मिळाल्या नाहीत? असे वाटून मन खट्टू होते. त्यातून इर्षा निर्माण होते. अशी इर्षा निर्माण झाल्यास मनुष्य स्वतःची प्रगती न करता स्वतःची मानसिक शांती नष्ट करतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. अनेक लोक आपआपल्या परीने चांगली कामे करीत असतात. परंतु त्याच बरोबर ते परस्परांचा द्वेश ही करीत राहतात. चढाओढ करीत राहतात. विशेषत: धर्म, पंथांमध्ये ही चढाओढ अधिक दिसते. विविध पंथ आपलाच पंथ किंवा विचार मोठा असे दाखवण्यासाठी धडपडतांना दिसतात. त्यातून दोघांचाही विकास होत नाही. म्हणून मुदीता भावनेचा विकास करावा. अशी इर्षा निर्माण होऊ नये म्हणून जपावे.
काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या क्षमतेच्या पलिकडच्या असतात. तरीही त्या गोष्टींनी आपण कष्टी होत असतो. उदाहरणार्थ काही देश किंवा जागतिक पातळीवरच्या समस्या असतात, गुंडगिरी, वाढती महागाई, अमानवी घटना घडणे, क्रूर हत्याकांड अशाप्रकारच्या घटना आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकतो. बघतो. सहृदयी माणूस त्यामुळे दुःखी होतो. अस्वस्थ होतो. पूर्ण दिवस अस्वस्थेत जातो. अशावेळी काय करणार? ह्या घटना रोखणे आपल्या हाती नसते. अशावेळी त्या होऊ नये म्हणून जास्तीत जास्त आपण प्रार्थना करू शकतो. ” ईश्वरा त्यांना सद्बुद्धी दे, हे सर्व थांबावे, सर्वांचे कल्याण व्हावे” इतकीच प्रार्थना आपण करून शांत व्हावे. यास उपेक्षा भावना म्हणतात. आधीच जग दुःखी आहे आहे त्यात आपल्या दुःखाची भर कशाला! असा व्यापक विचार करून आपण शांत राहावे. आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना जमेल तेवढे सहाय्य करून त्यांस सुखी करण्याचा प्रयत्न करावा. व जे ही व्यवस्था नीट करण्यासाठी धडपडत आहेत त्यांना आत्मिक बळ मिळण्यासाठी ईश्र्वराजवळ प्रार्थना करावी. शुभसंदेश पाठवावेत. व त्यांची हिम्मत वाढवावी.
आपल्या वयक्तिक दुःखातून बाहेर पडण्यासाठी मैत्री, करुणा, मुदीता, आणि उपेक्षा ह्या चार भावना अत्यंत उपयुक्त ठरतात. या चार भावनांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपल्या बाह्य घटकांचा आपल्या उन्नतीस अडथळा न होता उलट ते सारे घटक आपल्याला सहाय्यभूत कसे होतील हे पाहणे होय. आपल्या आत्मउन्नतीपासून आपले लक्ष ज्या ज्या वेळी हटते त्या त्या वेळी समस्या निर्माण होतात. बाह्य घटक उग्र रूप धारण करतात. व आपल्यास पिडा देतात. तणाव बाहेर आहे आत नाही. म्हणून ज्यावेळी तो जाणवेल तेव्हा अंतर्मुख व्हावे. स्वतःस जाणावे. व परावलंबित्व सोडावे. आत्मनिर्भर बनावे. एखाद्या बाह्य घटका मुळे मी अस्वस्थ होत असेन तर मी दुबळा आहे असे समजावे. असा कोण आहे की जो मला दुःखी करेल? असा तुमचा निर्धार होईल त्यावेळी तुम्ही जगातील सर्वात सुखी आणि आनंदी माणूस ठराल.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413