(नवी दिल्ली)
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. खासदार पाटील हे विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळाचा व्हिडिओ शूट करत असल्याचं समजताच राज्यसभेचे सभागृह नेते पियूष गोयल यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राज्यसभा सचिवालयानं खासदार रजनीताई पाटील यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित केलं आहे. राज्यसभा सचिवालयानं याबाबत निर्णय घेतला असून त्यामुळं आता उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळं आता राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यामुळं काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा- पाटील
राज्यसभा सचिवालयानं संसदेतील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निलंबित केल्यानंतर खासदार रजनीताई पाटील यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली आहे. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून येते, त्यामुळं मला अधिवेशनासाठीच काय तर संपूर्ण टर्म निलंबित केलं तरी चालेल, परंतु ज्या पद्धतीनं भाजपनं सभागृहात अपमान केलाय तो आम्ही सहन करणार नसल्याचं खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या आहेत.