(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पुरुषांना फसवून पोलिस केसच्या धमकी दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या घटना महिलांकडून होत असल्याची दिसून येत आहे. अशीच एक घटना रत्नागिरीत घडली आहे. ती रत्नागिरीत एका हॉटेलवर राहायला आली आणि तिने कामगाराला लुटण्यासाठी मालकालाच अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
हॉटेल व्यावसायिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी २०२३ रोजी ही महिला हॉटेलमध्ये वास्तव्यास आली होती. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या महिलेने आपल्या रूममध्ये बेडशीट खराब झाली असल्याचे स्वागत कक्षात सांगितले. त्यानुसार हॉटेलमधील कामगार रूममध्ये गेला असता बेडशीट व्यवस्थित होती. मात्र या महिलेने कामगाराने आपले ४ हजार ५०० रूपये चोरी केल्याचे सांगितले. पैसे मिळाले नाहीत तर आपण स्वतःला पेटवून घेवू अशी धमकी या महिलेकडून देण्यात आली.
दरम्यान हॉटेल चालकाविरूद्ध तक्रार देण्यासाठी ही महिला शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावेळी वाद नको म्हणून हॉटेल चालकाने या महिलेला ४ हजार ५०० रूपये दिले. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये या महिलेविरूद्ध अन्य ठिकाणी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. यानंतर या महिलेने रत्नागिरीतून रेल्वे स्टेशनमार्गे पळ काढला. हॉटेलमध्ये वास्तव्य करून उलट हॉटेल व्यावसायिकालाच ४ हजार ५०० रूपयांचा चुना लावून गेली.