(रत्नागिरी)
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या घातपात प्रकरणी अटकेत असलेला धार चालक पंढरीनाथ आंबेरकर याची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. पोलिस कोठडीत असलेल्या पंढरीनाथ आंबेरकरच्या छातीत कळा येऊ लागल्याचे त्याने पोलिसाना सांगितले. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पत्रकार वारीसे यांच्या घातपात प्रकरणी पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या वतीने शनिवार ११ फेब्रुवारी रोजी राजापूर तहसील कार्यालय येथे महामोर्चा काढण्यात येणार, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी दिली. या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिफायनरीविरोधी संघटनेतर्फे केले आहे.
कोकणातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलेल्या पंढरीनाथ आंबेरकरला छातीत दुखत असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, आता पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कलम ४ अन्वये नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कायद्यातील तरतुदीप्रमाणे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात वरच्या मजल्यावरती दोन नंबर स्पेशल खोलीत त्याला ठेवण्यात आलं आहे. बाहेर असलेल्या पोलिसांकडून कोणती माहिती दिली जात नाही. पंढरीनाथ आंबेरकर याला व्हीआयपी ट्रिटमेंट का दिली जाते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.