(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कुणबी समाजाचे एक निर्भीड, इमानदार पत्रकार शशिकांत वारीसे यांचा गुंड प्रवृत्तीच्या पंढरीनाथ आंबेरकर याने भर दिवसा स्वतःच्या चार-चाकी वाहनाने अपघात रुपी निर्घृण खून केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्व कुणबी बांधव एकवटले असून ११ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय राजापूर येथे निषेध महामोर्चा काढण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी ग्रुपमध्ये एका बातमीचा फोटो पोस्ट केला होता. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला धडक देत २०० ते २५० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात वारीशे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.
पत्रकार शशिकांत वारीसे हे कोकणात सरकारकडून प्रस्तावित केलेली महाप्रदूषणकारी पेट्रो केमिकल ऑईल रिफायनरी कोकणात होऊ नये, प्रदूषणापासून एकंदरीत कोकणाचे संरक्षण व्हावे व अशा रिफायनरीमुळे राजापुरातील जवळजवळ समाजजीवन उध्वस्त होऊ नये म्हणून स्थानिक जनतेची रिफायनरी विरोधी भूमिका आपल्या लेखणीतून मांडत होते. आणि याचाच राग मनात ठेवून गुंड प्रवृत्तीचा पंढरीनाथ आंबेरकर याने त्यांच्या अंगावर निघृण गाडी घालून हत्या केली.
या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता राजापूर शहर येथील तहसील कार्यालयावर कुणबी बांधवांकडून निषेध महामोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार समाज बांधवाच्या घरच्या मंडळींना पाठिंबा देण्यासाठी व आपल्या समाजाची एकी दाखविण्यासाठी सर्व कुणबी बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केले आहे.