(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जागुष्टे हायस्कूल कुवारबाव या प्रशालेचा मातृ मंदिर विश्वस्त संस्थेने ( द्वारा- ज्ञानप्रबोधिनी, पुणे) आयोजित केलेल्या समूह गायन स्पर्धेत कोकण-गोवाला विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
ज्ञान प्रबोधिनी पुणेची भगिनी संस्था असलेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी, पुणे यांच्यामार्फत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागाने समुहगायन, प्रशालेतील अध्यापक व सहकारी कर्मचारी यांच्या साठी समूहगायन, समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक १० सांगीतिक रागामध्ये सादर करणे, सूर्यनमस्कार, श्रमदान अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि पुणे अशा विभागांमधील जवळपास १५० शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी या संस्थेच्या जागुष्टे हायस्कूल कुवारबाव या प्रशालेतील 215 विद्यार्थ्यांनी आणि या प्रशालेतील सर्व अध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे यावर्षी प्रथमच सहभाग घेतला होता.
27 जानेवारी रोजी जागुष्टे प्रशालेतील सातवी ते नववीच्या २15 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तालासुरात सादर केलेल्या लिखित नवयुवकांनो देशासाठी व्रत हे स्वीकारा या समूहगीताला कोकण-गोवा या विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
मातृमंदिर विश्वस्त सस्थेमार्फत श्री.नितीनदादा सावंत आणि संगीततज्ञ श्री.प्राणेश पोरे सर यांनी या स्पर्धेसाठी जवळपास ७००० किलोमीटर प्रवास करुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सहभागी शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षण केले.
सर्व अध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांनी एकत्रित सादर केलेली कुसुमाग्रज लिखित अजरामर काव्य कृती ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ! अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार। या देशभक्तीपर समूहगीतास कोकण विभाग स्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रशालेत संगीत विषयाचे शिक्षक नाहीत पण ही उणीव या प्रशालेवर नितांत प्रेम करणारा आमचा माजी विद्यार्थी सतीश रामचंद्र राठोड याने भरून काढली.
सतीश राठोड स्पर्धेच्या अगोदर जवळजवळ पंधरा दिवस शाळेत येऊन सुमारे तीन तास 215 विद्यार्थी यांचं समूह गीत आणि समस्त अध्यापक अध्यापकेतर कर्मचारी यांचं समूहगीत सराव करून घेत होता.
आमच्या ग्रामीण भागातील ताल-सूर-आलाप-सरगम याची काहीही जाण नसलेल्या विद्यार्थ्यांनी हा तृतीय क्रमांक पटकावला या सगळ्याचं श्रेय केवळ आणि केवळ आमचा माजी विद्यार्थी सतीश राठोड याला आहे. सतीश राठोड याचं विशेष मार्गदर्शन आणि शाळेतील समस्त अध्यापक अध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य यामुळे मिळालेल्या या यशाचे आमच्या प्रशालेचे संस्थाधिकारी आणि कुवारबाववासीय यांच्याकडून कौतुक होत आहे.