(रत्नागिरी / दादा जाधव)
जिल्ह्यातील खेलो इंडिया बॅडमिंटन उपक्रमातील खेळाडू मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण घेत आहेत मात्र प्रशिक्षक मागील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित असल्याने बॅडमिंटन प्रशिक्षणावर त्याचा ‘बॅड इफेक्ट’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशिक्षक मानधन मिळत नसल्याने अर्ध्यावर प्रशिक्षण सोडून गेल्यास पुढे काय? अशी चिंता आता पालकांना भेडसावू लागली आहे. यामुळे चिंताग्रस्त पालकांनी आपली व्यथा थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे घेऊन जाण्याचे ठरविले आहे.
भारताच्या भावी पिढीत खिलाडू वृत्ती रुजावी, अंगी फिटनेस यावा यासाठी केंद्र सरकारने खेलो इंडिया उपक्रमातून जिल्ह्यात बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे .यामध्ये जिल्हभरातून सध्या सुमारे 30 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षित खेळाडू देखील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र बॅडमिंटनच्या प्रशिक्षकांना मागील सहा महिन्यांपासून मानधनच मिळत नसल्याने त्याचा ‘बॅड इफेक्ट ‘खेळाडूंच्या प्रशिक्षणावर होतो की काय ?याबाबत पालक चिंताग्रस्त झाले आहेत. प्रशिक्षकांनी जर प्रशिक्षण देणे सोडून दिले तर विद्यार्थ्यांचा सराव कसा होणार? यामुळे सर्व पालकांनी आपला मोर्चा थेट पालकमंत्र्यांकडे वळविण्याचे ठरविले आहे गुरुवारी सर्व चिंताग्रस्त पालक जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, भेटून त्यांच्यासमोर आपले गारहाने मांडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सर्व पालकांची नुकतीच एक बैठक झाल्याचे समजते. प्रशिक्षकांची मानधनाकडून उपासमार होणार असेल तर फिटनेस ते कसा शिकवणार? असा खोचक सवाल ही पालकांमधून विचारला जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा असेही पालकांचे म्हणणे आहे.
मानधनाचा प्रस्ताव केंद्राकडे वेळेवर सादर केला जातो की नाही? याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी असे पालकांचे मत आहे आहे जिल्ह्यात प्रशिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे प्रशिक्षक असेच मानधनापासून दीर्घकाळ वंचित राहिल्याने प्रशिक्षक पद सोडून गेले होते. आता तसे न होवो यासाठी सर्व पालक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची भेट घेणार पालकमंत्री आम्हा पालकांची भूमिका समजून घेऊन आपली योग्य ती भूमिका घेतील अशी पालकांना अपेक्षा आहे.